प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी मुलगा किंवा मुलगी होण्यासंदर्भात अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचे काम केले असून, त्यांनी ते सिद्ध करून दाखवल्यास त्यांना 25 लाखांचे बक्षिस देण्यात येईल, असे पत्रकार तसेच आरपीआय आठवले गटाचे प्रदेशा कार्याध्यक्ष क्रांतीकुमार जैन यांनी जाहीर केले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी ‘ऑड-इवन’ फॉर्मूल्याप्रमाणे मुलगा व मुलगी होण्याचे रहस्य किर्तनातून सांगितल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इंदोरीकर महाराज कलम (22) अंतर्गत गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केेल्याचे क्रांतीकुमार जैन यांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या अजब-गजब वक्तत्वामुळे अंधश्रद्धेला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालण्याचे काम किर्तनाच्या माध्यमातून इंदोरीकर महाराजांनी चालविले असल्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण इंदोरीकरांना त्यांचे वक्तव्य सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले असून, ते जर सिद्ध करून दाखवत नसतील तर त्यांनी महाराष्ट्र जनतेची जाहीर माफी मागावी,असे क्रांतीकुमार जैन यांनी म्हटले आहे.